११. गरीबी
रहायला नाही त्यांना घर
कपडे नाहीत धड अंगावर
जन्मच त्यांचा होतो मुळी
रस्त्यातल्या उकीरड्यावर
मिळत नाही त्यांना भाकर
चहात त्यांच्या नाही साखर
तशीच भूक मारुन बिचारे
देत असतात कोरडे ढेकर
ते पितात आसवांचे घोट
खपाटीला गेलंय त्यांचं पोट
जीव ओला करण्यासाठी
चाटत बसतात आपलेच ओठ
उघड्यावरचा त्यांचा संसार
पोराटोरांचं वाढतं लेंढार
त्यांच्या फाटक्या संसाराला
पडलं आहे मोठं खिंडार
ते राबतात उन्हा तान्हाशी
पोरं त्यांची अर्धी उपाशी
थकून भागून झोपताना
जमीन खाली दगड उशाशी
बसली आहेत त्यांची गालफडे
हातापायाची नुसतीच लाकडे
तरीही संसार सावरण्याचे
प्रयत्न करत असतात बापडे
नाहीत त्यांना सणवार
सुखापेक्षा दुख्खच फार
त्यांच्या निर्जीव डोळयांतून
वाहात असते सुकीच धार
डोळ्यात त्यांच्या भाव उदास
चेहरा त्यांचा दिसतो भकास
शून्यातल्या नजरेसमोर
होतो त्यांना फासाचा भास
--- लबाड बोका
गरीबांचा तिरस्कार करू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा