२२ . पूर
असा कसा अचानक
आला पावसाला जोर
धो धो कोसळे पाऊस
जणू फाटलं आभाळ
नदीलाही आला पूर
पाणी गावात शिरलं
बघता बघता कसं
गाव पाण्यात बुडालं
तरारलं शेत माझं
कापणीला आलं होतं
कसं झालं आकरीत
पिक वाहिलं पूरात
पावसानं केला घात
ही काय झाली रीत
काही कळायच्या आत
पाणी शिरलं घरात
पाणी चढलं चढलं
पार आढ्याला भिडलं
गरीबाचं घर माझं
असं पाण्यानं गिळलं
ल्हान ल्हान माझी पोरं
गेली पूरात व्हावून
असा अभागी मी बाप
गेलो पुरता खचून
आता थांबला पाऊस
आणि ओसरला पूर
पण माझ्या पापण्यांत
आसवांचा महापूर
काय करू मी जगून
नको मदतीचा हात
माझ्या साऱ्या संसाराची
झाली पुरी वाताहात
पूरग्रस्तांना मदत करा.
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा